ईदगाह मैदानावर उत्साहात साजरी झाली बकरी ईद; मुस्लिम बांधवांची नमाजसाठी मोठी गर्दी

गुरुवार २८ मे २०२६
पूर्णा शहरात आज ‘बकरी ईद’ (ईद-उल-अझा) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. या पवित्र सणानिमित्त शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ८ वाजता नमाज पठणासाठी मुस्लिम समाज बांधवांची अलोट गर्दी उसळली होती.हा सण हजरत इब्राहिम (अ.) यांच्या त्याग आणि बलिदानाच्या स्मृतीनिमित्त साजरा केला जातो. नमाज पठणानंतर उपस्थितांनी एकमेकांना भेटून ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. या सणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गरिबांना मदत करून समाजात बंधुभाव आणि समतेचा संदेश देणे हा आहे. नमाज पठणादरम्यान देशात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी विशेष प्रार्थना करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी या दिवशी सामाजिक सलोखा जपण्याचा संकल्प केला आहे.याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पूर्णा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. नमाज पठणानंतर पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे आणि तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. विशेषतः पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी केलेल्या चोख पोलीस बंदोबस्तामुळे आणि त्यांच्या सतर्क नियोजनामुळे हा सण अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला, ज्याबद्दल नागरिकांनी त्यांच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले.



