अभिनव विद्या विहार शाळा मध्ये घराणेशाहीचा कळस!शालेय समितीच्या नियमबाह्य कारभारावर कारवाईची मागणी

बुधवार १ जुलै २०२६
पूर्णा (प्रतिनिधी प्रतिनिधी) पूर्णा शहरातील अभिनव विद्या विहार प्रशाळा शाळा व्यवस्थापन समितीच्या संशयास्पद आणि नियमबाह्य कारभारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.गेल्या दशकाहून अधिक काळ शाळेच्या कारभारावर एकाच गटाची मक्तेदारी असून, लोकशाही नियमांना बगल देऊन समिती चालवली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.शाळा व्यवस्थापन समितीच्या नियमांनुसार, समितीचे पदाधिकारी स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या शाळेचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर येथे,तर सचिव पुणे शहरात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.लांब अंतरावर राहून शाळा कामकाजावर देखरेख ठेवणे अशक्य असताना,या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गेल्या १०-१२ वर्षांपासून कोणतीही निवडणूक प्रक्रिया न राबवता मनमानी पद्धतीने समिती गठीत केली आहे.तसेच, निवृत्त शिक्षक व पदाधिकारी पदावर नसतानाही शाळा प्रशासनावर पूर्णपणे नियंत्रण राखून आहेत.या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून स्वतःच्या घरातील व्यक्तींची कर्मचारी म्हणून नियुक्ती केल्याचा संशय व्यक्त होत असून,शाळेतील कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची (डी.एड./बी.एड.) वैधताही संशयास्पद आहे.या गंभीर गैरप्रकारांची दखल घेत जाकीर पठाण यांनी गट शिक्षणाधिकारी, पूर्णा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्या शालेय समितीची बरखास्ती आणि नियमबाह्य नियुक्त्यांची चौकशी करून मुख्याध्यापकांवर व संबंधित पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.शिक्षण विभाग आता यावर काय पावले उचलतो, याकडे आता संपूर्ण पूर्णा शहराचे लक्ष लागले आहे.



