Uncategorized

सोनखेड पेट्रोल पंपावर भरदिवसा खून; अवघ्या काही तासांत आरोपी जेरबंद

गुरुवार ११ जून २०२६

नांदेड प्रतिनिधी सोनखेड (ता. नांदेड) येथील मोरगे पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून एकाची काठीने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना १० जून रोजी घडली. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने काही तासांच्या आतच नांदेड शहरातून शिताफीने अटक केली. पवन राजेभाऊ चौधरी (वय २३) आणि बालाजी शिवाजीराव मोरे (वय ३६, दोघेही रा. सोनखेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मृतक किफायत अली ख्वाजा मोईनोद्दीन हे १० जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सोनखेड येथील मोरगे पेट्रोल पंपावर आले होते. यावेळी तेथे उपस्थित आरोपींनी त्यांना “तू प्लंबर आहेस का?” असा प्रश्न विचारला. यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपींनी किफायत अली व साक्षीदारांना काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किफायत अली यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०३, ११८(१), ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठित करण्यात आले.तपासादरम्यान, आरोपी नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना पुढील कार्यवाहीसाठी सोनखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, स.पो.नि. भागवत नागरगोजे, विठ्ठल योगारे, महेश कोरे, पो.उप.नि. साईनाथ पुयड, नागनाथ तुकडे, स.पो.नि. वैशाली कांबळे (सोनखेड) आणि विशेष पथकातील अंमलदारांनी यशस्वी केली. आरोपींना अवघ्या काही तासांत जेरबंद केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!