अतिक्रमण हटाव मोहिमेतील दुजाभावाचा आरोप; ‘भ्रष्टाचार विरोधी समिती’चे उपोषण स्थगित

पूर्णा (शहर प्रतिनिधी) बुधवार, १० जून २०२६
पुर्णा शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत गरीब व्यावसायिकांवर कारवाई करून बड्या धेंडांना अभय दिले जात असल्याचा आरोप करत, ‘भ्रष्टाचार विरोधी समिती’चे तालुकाध्यक्ष चंद्रमणी रामा लोखंडे यांनी १० जूनपासून पुकारलेले बेमुदत आमरण उपोषण प्रशासकीय आश्वासनानंतर ३० जूनपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.नगर परिषदेकडून शहरातील गरिबांच्या हातगाड्या व टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन परिसर, शिवाजी चौक व बसस्थानक परिसरातील पक्की अतिक्रमणे कायम असल्याचे लोखंडे यांचे म्हणणे आहे. या दुजाभावाच्या निषेधार्थ लोखंडे यांनी आज सकाळी आंबेडकर पुतळा परिसरात आमरण उपोषण सुरू केले होते.या उपोषणाची दखल घेत पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या सूचनेवरून पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या आशयाची नोटीस बजावली. त्यानंतर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अशोक पारवे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी दिलेल्या लेखी पत्रात, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सध्या नवीन धोरणात्मक निर्णय घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. आचारसंहिता संपल्यानंतर सर्व अतिक्रमणांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर लोखंडे यांनी आपले उपोषण ३० जूनपर्यंत स्थगित केले आहे.





