पावसाअभावी उभी ऊसाची पिके वाळली; लासीना कालव्याचे पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव

गुरुवार ११ जून २०२६
वसमत(प्रतिनिधी):हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या लासीना कालव्यावर अवलंबून असलेल्या विविध गावांतील शेतकऱ्यांची ऊसाची पिके पाण्याअभावी वाळू लागली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन लासीना कालव्याचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी केली आहे.पूर्णा प्रकल्पाच्या लासीना कालव्याच्या लाभक्षेत्रात देगांव, सुहागन, पांगरा, पिंपळा लोखंडे, मरसुल, गोविंदपूर, पांढरी आणि चुडावा या गावांचा समावेश आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ऊसाची लागवड केली आहे. विभागाचे पाणी पाळीचे नियोजन संपले असले तरी, सध्या पावसाने मोठी ओढ दिली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने उभी ऊसाची पिके वाळून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पिकांना जीवनदान मिळावे, यासाठी कालव्यातून पाणी सोडणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर प्रशांत प्रकाशराव ढोणे, आनंद माणिकराव ढोणे, अमोल भगवान ढोणे, संदीप साहेबराव ढोणे, सुनील शिवाजी इंगोले, माऊली पाटील भोसले, आनंदराव पारवे, गोविंदराव टिकाराम देसाई आणि देगांवचे सरपंच कैलास पाटील इंगोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग (वसमत) आणि आमदार चंद्रकांत (राजुभैय्या) नवघरे यांनाही सादर करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणी न सोडल्यास मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.



