गरीब फेरीवाल्यांवर कारवाई, मात्र बड्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी भ्रष्टाचार विरोधी समिती चे आजपासून अर्धनग्न उपोषण

पूर्णा (प्रतिनिधी): बुधवार, १० जून २०२६
पूर्णा नगर पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील दुटप्पी धोरणाचा निषेध करत आणि भ्रष्ट मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी, भ्रष्टाचार विरोधी समितीचे तालुकाध्यक्ष लोखंडे आजपासून (बुधवार, १० जून) शहराच्या मध्यवर्ती असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अर्धनग्न आमरण उपोषणास बसले आहेत.नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कृष्ट गुट्टे यांनी मार्च २०२६ मध्ये संपूर्ण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्ष कारवाई करताना नगर पालिकेने केवळ अत्यंत गरीब, हातावर पोट असणाऱ्या चणे-फुटाणे विक्रेते, मोची आणि पान टपरीधारकांनाच लक्ष्य केले. या कारवाईमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.दुसरीकडे, शहरातील डॉ. आंबेडकर चौक, शिवाजी चौक, बसवेश्वर चौक, टेलिफोन परिसर आणि पोलीस स्टेशन परिसरातील बड्या आणि पक्क्या अतिक्रमणांकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. मोठ्या अतिक्रमणधारकांकडून आर्थिक लाच घेऊन त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे.या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून मुख्याधिकारी डॉ. गुट्टे यांना तात्काळ निलंबित करावे, ही प्रमुख मागणी समितीने लावून धरली आहे. उपोषणादरम्यान स्वतःच्या प्रकृतीला किंवा जीवितास काही धोका निर्माण झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी आणि नगर परिषद प्रशासनाची राहील, असा इशाराही लोखंडे यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही देण्यात आली असून, प्रशासनाची यावर काय भूमिका असणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.




