पूर्णा शहरात पोलिसांची धडक मोहीम कायदा हातात घेणाऱ्यांची खैर नाही

पूर्णा (शहर प्रतिनिधी )
मंगळवार 26 मे 2026
बकरी ईदचा सण शांततेत आणि सलोख्याने पार पडावा, या उद्देशाने पूर्णा पोलीस प्रशासनाने आज शहरात विशेष रूट मार्च काढत आपली कडक धोरणे स्पष्ट केली आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा हा सशस्त्र ताफा रस्त्यावर उतरल्याने समाजकंटकांचे धाबे दणाणले आहेत.पोलीस प्रशासनाच्या वतीने आज शहराच्या मुख्य मार्गांवरून संचलन करण्यात आले. या रूट मार्चमध्ये ५ वरिष्ठ पोलीस अधिकारी, १०० पोलीस अंमलदार आणि होमगार्डच्या जवानांचा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता. विशेष म्हणजे, या पथकात राज्य राखीव पोलीस बल (SRPF) आणि दंगल नियंत्रण पथकाच्या (RCP) तुकड्यांचा समावेश असल्याने पोलिसांची ताकद प्रभावीपणे दिसून आली. हातामध्ये शस्त्र आणि लाठीसज्ज असलेले पोलीस रस्त्यावरून मार्गक्रमण करत असतानाचे दृश्य शहरातील सुरक्षेचे कवच अधिक मजबूत करणारे ठरले.पोलीस ठाण्यापासून सुरू झालेला हा रूट मार्च शहरातील प्रमुख बाजारपेठ, मुख्य चौक आणि विविध भागांतून काढण्यात आला. सणानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, ही रणनीती समाजकंटकांवर वचक निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरली आहे.अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनबकरी ईदच्या उत्सवात कोणत्याही अफवांना थारा देऊ नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सोशल मीडियावर प्रक्षोभक मजकूर व्हायरल करणे किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी दिला आहे.सण उत्साहात साजरा करताना नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शहरात सध्या चोख पोलीस बंदोबस्त तैनात असून, प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर आहे.



