ईद-उल-अजहा(बकरी ईद) कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पूर्णा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

सोमवार 25 मे 2026
पूर्णा: (प्रतिनिधी) येत्या काळात येणाऱ्या ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) सणाच्या पार्श्वभूमीवर, शहरात धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता अबाधित राखण्यासाठी, आज सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता पूर्णा पोलीस ठाण्यात शांतता समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. समाधान पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, ते शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. सण-उत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि सर्व समाजबांधवांनी बंधुभावाच्या वातावरणात सण साजरा करावा, यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार आहे.पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी या बैठकीसाठी शहरातील शांतता समितीचे सर्व सदस्य, लोकप्रतिनिधी (नगरसेवक), ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनासह सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी केले आहे. बैठकीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व निमंत्रित सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे सूचित करण्यात आले आहे.



