Uncategorized

पूर्णा पोलिसांची मोठी कारवाई दोन जबरी चोऱ्यांमधील ५ अट्टल चोरटे गजाआड

शुक्रवार 20 मार्च 2026

पूर्णा (प्रतिनिधी):शहरात मागील काही दिवसांपासून प्रवाशांना लुटणाऱ्या आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पूर्णा पोलिसांना मोठे यश आले आहे. दोन वेगवेगळ्या जबरी चोऱ्यांच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी ५ अट्टल गुन्हेगारांना शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ६ दुचाकी आणि ११ मोबाईल असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुर्णा शहरात १३ ते १६ मार्च दरम्यान चोरीच्या दोन गंभीर घटना घडल्या होत्या. पहिल्या घटनेत माटेगाव येथील आत्माराम बोबडे यांचा मोबाईल हिसकावण्यात आला होता. तर दुसऱ्या घटनेत, १३ मार्च रोजी सायंकाळी अलंकार नगर येथील मनोहर सोपान माघाडे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना चोरट्यांनी त्यांना अडवून जबर मारहाण केली. माघाडे यांच्या छातीवर बसून त्यांना जखमी करत चोरट्यांनी त्यांची दुचाकी, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली होती.तपासाची चक्रे अन् पोलिसांची कारवाई:या दोन्ही घटनांची तक्रार प्राप्त होताच, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत आयुष राजेंद्र बरकुंटे, अंकित संजय गायकवाड, श्रीनिवास गाडगे यांच्यासह अन्य दोन अशा एकूण ५ जणांना ताब्यात घेतले. मुद्देमाल जप्त:पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईत चोरट्यांकडून चोरीच्या ६ दुचाकी आणि ११ महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या सर्वांची एकूण किंमत ८ लाख ५० हजार रुपये आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.रेल्वे स्थानक परिसर आणि शहरात चोरट्यांचा वावर रोखण्यासाठी स्थानिक पोलीस आणि रेल्वेचे जीआरपी पोलीस संयुक्तपणे गस्त घालत आहेत. नागरिकांनी आपली दुचाकी उभी करताना हँडल लॉक करावे आणि मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांनी केले आहे.सदर कारवाई पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सपोनि गजानन पाटील, श्रीनिवास पडलवार, प्रकाश इंगोले, शेख ताजोद्दीन, सुरेश राठोड, रमाकांत तोटेवाड, अजय माळकर, सुरेश चव्हाण, सुधीर काळे, माधव अकलवाड या पथकाने यशस्वी केली कार्यवाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!