पूर्णा तालुक्यात वाळू चोरांवर महसूलचा ‘सर्जिकल स्ट्राईक ७ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबर व संदलापुर शिवारात मध्यरात्री कारवाई अडीच लाखांचा दंड ठोठावला

3 जानेवारी 2026
पूर्णा (प्रतिनिधी)
पुर्णा क्यातील मुंबर आणि संदलापुर शिवारात अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल विभागाने जोरदार मोहीम उघडली आहे. नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मध्यरात्री छापेमारी करत ७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एक टिप्पर, एक ट्रॅक्टर आणि ४ ब्रास वाळूचा समावेश असून, संबंधित वाहनांवर अडीच लाख रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.अशी झाली कारवाई:पूर्णा नदीपात्रातून गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर व तहसीलदार माधवराव बोथिकर यांना मिळाली होती. या माहितीवरून तहसीलदार बोथिकर यांनी विशेष पथक तयार करून रात्री गस्तीवर पाठवले होते.२ जानेवारीच्या मध्यरात्री मुंबर शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणारा सुमारे ४ लाख रुपये किमतीचा टिप्पर (क्र. MH 45/0433) पथकाने नाट्यमय पाठलाग करून पकडला. नदीपात्रात धाड: संदलापुर शिवारातील पूर्णा नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करणारे विना नंबरचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली जप्त करण्यात आली. याची किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे.वाळू माफियांना जरब:जप्त केलेला ७ लाखांचा मुद्देमाल रितसर पूर्णा तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी या दोन्ही वाहनांवर अडीच लाख रुपयांहून अधिक दंड आकारल्याची माहिती दिली. या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.या मोहिमेत नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्यासह महसूल कर्मचारी मुरलीधर मोरे, शिवा देवणे, साईनाथ द्याडे व स्थानिक तलाठ्यांच्या पथकाचा सहभाग होता.




