बनावट कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा

सोमवार.26. जानेवारी 2024
नांदेड / प्रतिनिधी
शहरातील भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी असल्याचे दाखवून बनावट कागदपत्रे तयार केली आणि मनपाचे गाळे हडपल्या प्रकरणी मो. शफी मो. बुऱ्हाण, अब्दुल वसीम अब्दुल मजीद बागवान व मो. जावेद अब्दुल जलील बागवान यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा असा आदेश नांदेडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत अशी माहिती तक्रारदार मो. तौफीक शेख संदील यांनी दिली आहे. शहरातील केळी मार्केट भागात मनपाने भाजीपाला मार्केट उभारले आणि त्याचे गाळे मनमानी पध्दतीने वाटप केले. या साऱ्या प्रकारात काही जणांनी हात धुवून घेतले. जे खरेच भाजीपाला व्यापारी आहेत त्यांनी नांदेड भाजीपाला व्यापारी असोसिएशन स्थापन केली होती. परंतु त्यांच्याच नावे बनावट कागदपत्रे तयार करुन मो. शफी मो. बुऱ्हाण, अब्दुल वसीम अब्दुल मजीद बागवान आणि मो. जावेद अब्दुल जलील बागवान यांनी आमचीच भाजीपाला व्यापारी असोसिएशन खरी असल्याचे दाखवून गाळे वाटपातही गैरव्यवहार केला. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मो. तौफिक शेख संदील
यांनी याबाबत मनपा व संबंधीत यंत्रणेकडे तक्रार करुन या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी केली होती. परंतु संबंधीत यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांनी नांदेडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पुराव्यासह तक्रार दाखल केली आणि उपरोक्त तिघांविरुध्द विविध प्रकारचे गुन्हे दाखल करावेत अशी विनंती केली होती.
या अनुषंगाने सीआरपीसी कलम १५६ ३ नुसार त्यांनी तक्रार क्रमांक १८६/२४ दाखल केली होती. त्यावर न्यायाधीशांनी सर्व कागदपत्रे, फिर्यादीचा जवाब याचे अवलोकन करुन या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून उपरोक्त तिघांविरुध्द कलम ४२०, ४६८,४७१,४०६,४०९, १२० ब, ५०४,५०६, ३४ दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात तक्रारदारातर्फे अॅड. आकाश लाडे यांनी काम पाहिले त्यांना अॅड. पी.एस. राठोड, अॅड. कृष्णा तिडके, अॅड. विशाल काळे यांनी मदत केली. सामाजिक कार्यकर्ते मिर्झा खलील बेग गुलाब बेग उर्फ बेग भाटिया यांनी सहकार्य केल्याचे मो. तौफिक शेख यांनी सांगितले.
