जुन्या मटन मार्केटच्या जागेवर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सभागृह उभारा नगरसेवक कुरेशी शेख रऊफ यांची मागणी

बुधवार 15 एप्रिल 2026
पूर्णा (ता. प्रतिनिधी): येथील अशोक रोड भागातील जुन्या मटन मार्केटची जागा सध्या रिक्त असून, या मोकळ्या जागेवर भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने भव्य बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक कुरेशी शेख रऊफ शेख महेबूब यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.शहरातील अशोक रोड परिसरात गेल्या ५० ते ६० वर्षांपासून मटन मार्केट कार्यरत होते. मात्र, नगर परिषदेने ठराव घेऊन सदर मार्केटचे बांधकाम पाडले आहे. सध्या ही जागा पूर्णपणे मोकळी असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ही जागा नगर परिषदेच्या मालकीची असल्याने तिचा उपयोग समाजहिताच्या कामासाठी व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे.शैक्षणिक व सामाजिक कार्याला मिळणार चालना:देशाचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने या ठिकाणी सभागृह उभारल्यास, शहरात सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना मोठी मदत होईल. या सभागृहामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.ठराव मंजूर करण्याची विनंती:वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरात अशा सार्वजनिक सभागृहाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी या विषयात जातीने लक्ष घालून येणाऱ्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाचा ठराव बहुमताने मंजूर करावा व हा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनम्र विनंती कुरेशी शेख रऊफ यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी परभणी व नगराध्यक्षांनाही सादर करण्यात आल्या आहेत.




