अँड. स्वप्नील जमदाडे कडून जिल्हा परिषद शाळेला वडाची झाडे भेट

बुधवार १७ डिसेंबर २०२५
पूर्णा प्रतिनिधी :पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढीमध्ये निसर्गप्रेमाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने पूर्णा शहरातील अँड. स्वप्निल जमदाडे यांनी दि. १६ डिसेंबर रोजी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला पाच वडांची झाडे भेट दिली. शाळा परिसरात वृक्षारोपण करत त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान जपले.या उपक्रमामुळे शाळा परिसर हिरवागार होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश जाणार आहे. वडाचे झाड हे दीर्घायुषी, पर्यावरणपूरक व पिढ्यान्पिढ्या सावली देणारे असल्याने भविष्यात या झाडांमुळे शाळा परिसराला लाभ होणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.या कार्यक्रमावेळी सय्यद प्यारे साहेब, आनंद गरुड, विवेक आडणे, पत्रकार सुशिल गायकवाड, सय्यद सलीम सुहागनकर, जाकीर पठाण मनोज भुजबळ, आकाश सूर्यवंशी, दिलीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची चळवळ वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. शाळा प्रशासनाने अँड. स्वप्निल जमदाडे यांचे आभार मानत विद्यार्थ्यांनी या झाडांची निगा राखून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. हा उपक्रम पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक जाणीव जागृत करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



