नवनिर्वाचित पालकमंत्री ना.संजय बनसोडे यांचे आ.डॉ.गुट्टेंनी केले अभिनंदन!

गंगाखेड प्रतिनिधी:
साहेब, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याबद्दल खूप अभिनंदन! एका ऐतिहासिक जिल्ह्याची धुरा सांभाळताना तुम्हाला चांगला अनुभव येईल. तसेच मराठवाड्यातील लोकांची सेवा करण्याची हि एक संधीचे सोने करा. तुम्ही माझे जिवलग मित्र आहात. त्यामुळे मित्र पालकमंत्री झाल्याचा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे, अशा शब्दात गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी नवनिर्वाचित पालकमंत्री ना.संजय बनसोडे यांचे भ्रमणध्वनीद्वारे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री कार्यालयाने काल प्रसिद्ध केलेल्या पालकमंत्री यादीनुसार क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांच्याकडे परभणी जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ना.बनसोडे यांची हि आमदारकी पहिली तर मंत्रीपदाची दुसरी टर्म आहे. यापूर्वीही त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे. मात्र, पालकमंत्री पदाची माळ पहिल्यांदाच त्यांच्या गळ्यात पडली आहे.
ना.बनसोडे आणि आ.डॉ.गुट्टे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. मागील अधिवेशनात विधानसभेच्या हिरवळीवर ना.बनसोडे, आ.डॉ.गुट्टे आणि आ.कैलास पाटील यांच्यातील संवादाचा फोटो सोशल मिडीयात चांगलाच व्हायरल झाला होता. ते नेहमी ऐकमेकांना आपुलकीने बोलतात व भेटतात. राजकीय चौकटीच्या बाहेर जाऊन ना.बनसोडे व आ.डॉ.गुट्टे यांनी मैत्री जपली आहे. त्यामुळे मित्र पालकमंत्री झाल्याचा डोंगराएवढा आनंद असल्याची प्रतिक्रिया आ.डॉ.गुट्टे यांनी दिली आहे.
विधिमंडळाच्या कामकाजात कितीही व्यस्त असले तरी परिसरात भेटल्यावर आपुलकीने विचारपूस करणारे, प्रेमाने बोलणारे मित्रवर्य ना.संजय बनसोडे हे संघटन कौशल्य व दुरदृष्टीचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्याच्या विकासास हातभार लागेल, असा विश्वास आ.डॉ.गुट्टे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आनंदी आनंद गडे! असे कॅप्शन देत आ.डॉ.गुट्टे यांनी सोशल मिडीयातून हटके शुभेच्छा देऊन बनसोडे व गुट्टे मैत्रीवर प्रकाश टाकला आहे.



