नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. विमलबाई कदम यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

गुरुवार 1 जानेवारी 2026
पूर्णा (प्रतिनिधी)
नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पूर्णा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. विमलबाई लक्ष्मणराव कदम यांनी आपल्या पदाची सूत्रे अधिकृतपणे हाती घेतली. या सोहळ्याप्रसंगी बोलताना गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न मांडतानाच कडक इशाराही दिला.विकासाचा शब्द आणि बोगस कामांना चापपदग्रहण सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे म्हणाले की, “पूर्णा शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द देतो. मात्र, विकासकामे करताना गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही. शहरात कुठेही बोगस कामे होऊ देणार नाही आणि तसा प्रकार आढळल्यास तो खपवून घेतला जाणार नाही.” पारदर्शक आणि दर्जेदार कारभारातूनच पूर्णा शहराचा विकास करण्याचे स्वप्न त्यांनी यावेळी व्यक्त केले.सर्वसमावेशक विजयाचा अभिमानआमदार गुट्टे यांनी या विजयाचे श्रेय सर्व समाजबांधवांना दिले. “या विजयात कुंभार, लिंगायत, गवळी, राजपूत, मारवाडी आणि मुस्लिम समाजासह सर्वच बांधवांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना सोबत घेऊन प्रगती साधू,” असेही त्यांनी नमूद केले.प्रशासकीय उपस्थिती आणि मान्यवरयावेळी पूर्णा नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर सुभाष देसाई (तालुका अध्यक्ष), बंटी भैय्या कदम (तालुका प्रभारी), संतोष एकलारे (माजी नगराध्यक्ष), मोहनराव मोरे (माजी नगराध्यक्ष), जामा मस्जिदचे मौलाना अहमद इमाम, लिंबाजी भोसले, लक्ष्मणराव कदम, ह.भ.प. सोपान काका बोबडे महाराज आणि पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.नवनिर्वाचित नगरसेवकांचा जल्लोषअहमद जोहराबी, मिरा होळकर, राजनंदिनी पंडीत, उत्तम खंदारे, मुकुंद भोळे, वंदना कुलदिपके, लक्ष्मीबाई भालेराव, प्रेमला सोळंके यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी यावेळी उपस्थित राहून नूतन नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.सकाळी ११ वाजता पदभार स्वीकारल्यानंतर सौ. विमलबाई कदम यांनी “आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या मूलभूत समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार,” असा संकल्प केला. समर्थकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत हा सोहळा साजरा केला.








